राम मंदिर मुद्द्यावर प्रवीण तोगडिया आजपासून बेमुदत उपोषणावर

नवी दिल्ली : अयोध्यामध्ये राम मंदिर निर्माणासंदर्भात मोदी सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे. विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना विहिंपच्या अध्यक्ष पदावरून पायउतार केल्यापासून ते सरकारविरोधात अधिकच आक्रमक झाले आहेत. तोगडिया यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा स्वीकारत राम मंदिर बांधणीच्या मागणीसाठी तोगडिया आजपासून बेमुदत उपोषणावर बसले आहे.

प्रवीण तोगडिया यांनी ३२ वर्षांपर्यंत विहिंपचे अध्यक्षपद भूषवले आहे. दरम्यान, तोगडिया यांनी विहिंपचे नवीन अध्यक्ष एस.कोकजे यांनाही आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. कोकजे यांनी एक तर उपोषणात सहभागी व्हावे अन्यथा त्यांनी राम मंदिर बांधण्यासंबंधी संसदेत विधेयक आणण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेने म्हटले होते, आम्हाला (संघ परिवार) संसदेत बहुमत मिळाले तर आम्ही विधेयक संमत करून राम मंदिर उभारण्याचा मार्ग सुकर करण्यात येईल. परिषदेने लोकांना अयोध्येत कार सेवा करताना प्राण पणाला लावण्याचे आवाहन केले होते. सुमारे ६० लोकांनी आपले प्राण त्यासाठी गमावले. गुजरातमधील हजारो जणांनी यासाठी आपले योगदान दिले होते. अशी माहितीही त्यांनी दिली.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना तोगडिया म्हणालेत की, ”सीमेवर असलेल्या जवानांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहेत. आमच्या मुली स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीत आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर गेले आहेत”.