राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठीच्या आरक्षणात आता ओबीसींचा देखील समावेश

नवी दिल्ली: राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा मंगळवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटद्वारे केली. या योजनेचे महत्वाचे मुद्दे जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहेत. या परीक्षेमध्ये एससी, एसटी आणि अपंग व्यक्तींसाठी आरक्षणाची तरतूद आहे. यामध्ये आता ओबीसींचाही समावेश करण्यात येईल.

२०१८ च्या शैक्षणिक वर्षासाठी ओबीसींच्या जागांवर प्रवेश देणे सुरु झाले आहे. त्यानंतर २०१९ साठी ओबीसींचा नवा कोटा लागू होणार आहे. त्याचबरोबर सरकारने एनटीएससी शिष्यवृत्तीतही दुप्पट वाढ करण्याचे ठरवले आहे. ही शिष्यवृत्तीची रक्कम १००० रुपयांवरुन २००० रुपये होणार आहे. त्याचबरोबर पीएचडीसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीत युजीसीच्या नियमांप्रमाणे बदल होईल, असेही जावडेकर यांनी सांगितले आहे.

देशभरातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेतली जाते. विद्यार्थ्यांमधील उच्च बुद्धिमापन आणि शैक्षणिक दृष्ट्या हुशार मुलांचा शोध घेण्यासाठी ही राष्ट्रीय पातळीवरील चाचणी घेतली जाते. सुमारे एक कोटी विद्यार्थी या परीक्षेसाठी दरवर्षी पात्र ठरतात. यांपैकी १००० यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते.

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा १९६२ मध्ये नॅशनल सायन्स टॅलेंट सर्च स्कीम अंतर्गत सुरु करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी करताना पहिल्यावर्षी दिल्लीतील ११ वीच्या विद्यार्थ्यांपैकी केवळ दहा जणांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती.