कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथर कार्यकर्त्यांच्या घरांवर पोलिसांच्या धाडी

पुणे/नागपूर : पुण्यातील एल्गार परिषदेत कोरेगाव – भीमा दंगल घडवून आणण्याचा कट रचण्यात आल्याच्या संशयावरून पुणे पोलिसांनी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथरच्या पुणे आणि नागपुरातील कार्यकर्त्यांच्या कार्यालय आणि घरावर धाडी टाकण्यास सुरुवात केली आहे.

पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर १ जानेवारी रोजी कोरेगाव – भीमा इथे दंगल घडून मोठा हिंसाचार उफाळला होता. त्याच्या निषेधार्थ दलित संघटनांनी ३ जानेवारीला राज्यभरात बंद पुकारला होता. या घटनेनंतर ७ जानेवारी २०१८ रोजी कबीर कला मंचचे चार जण, तर रिपब्लिकन पँथरच्या चार जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर आता या प्रकरणात आज पहाटेपासून पुण्यातील कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तर मुंबईत रिपब्लिकन पँथरच्या कार्यालयावर पुणे पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत. तर नक्षलवाद्यांचे खटले लढण्यासाठी प्रसिद्ध असलेले वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या नागपुरातील घरावर पोलिसांनी धाड टाकली आहे. गेल्या तासाभरापासून त्यांच्या घराची पोलीस कसून तपासणी करत आहे. गडलिंग गेल्या २० वर्षांपासून नक्षलवाद्यांच्या खटले लढत आहेत. पुणे पोलिसांनी ही धाड टाकल्याची माहिती समोर येत आहे.