प्लास्टीक बंदी मुळे पडणार ८० हजार कामगारांच्या रोजगारावर कुऱ्हाड ?

मुंबई : प्लास्टिकमुळे तयार होणारा कचरा आणि पर्यावरण हानीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या तब्बल ८० हजार रोजगारांवर कुऱ्हाड पडण्याची शक्यता आहे. राज्यात दोन हजार ५०० हून अधिक प्लॅस्टिक बॅग उत्पादकांद्वारे ८० हजारांहून जास्त लोकांना थेट रोजगार मिळतो. यापैकी २२०० पेक्षा जास्त युनिट्‌सची गुंतवणूक दहा लाख ते किमान दोन कोटी रुपयांच्या घरात आहे. या उद्योगातील एकत्रित गुंतवणूक चार हजार कोटींची असून, बंदीमुळे या सर्व घटकांना थेट फटका बसणार आहे.

राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदी केली आहे, त्याचा विपरीत परिणामाबाबत प्लॅस्टिक बॅग मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन चर्चा करत आहेत. प्लॅस्टिक बॅग उत्पादन एक सूक्ष्म आणि लघुउद्योग विभागात मोडणारा व्यापार आहे. प्लॅस्टिकचे विविध प्रकल्प व उपकरणांमध्ये तीन हजार ८०० कोटी रुपये गुंतवलेले आहेत आणि आज बाजारात ११ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा बाजारपेठेच्या बॅंकांमध्ये अडकला आहे.