कमांडरूमच्या माध्यमातून वृक्ष लागवडीत पारदर्शकता आणा वृक्ष लागवडीवरील लोकांचा विश्वास वाढवा – सुधीर मुनगंटीवार

मुंबई: नागपूर येथे उभारण्यात आलेल्या कमांडरूमच्या माध्यमातून वृक्ष लागवडीच्या कामात पारदर्शकता आणा आणि वृक्ष लागवडीवरील लोकांचा विश्वास वाढवा, असे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मंत्रालयात यासंदर्भात काल घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस वन सचिव विकास खारगे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

वृक्ष लागवड हा केवळ वन विभागाचा कार्यक्रम किंवा एखादा शासकीय उपक्रम नाही. यात लोकसहभाग हा महत्वाचा असून वृक्षलागवडीला जनाधार आणि व्यापक यश मिळवून द्यायचे असेल तर कामातील पारदर्शकता, विश्वासनियता, अचूक भौतिक नियोजन महत्वाचे आहे. मागील दोन वर्षात राज्यात जवळपास आठ कोटी हून अधिक वृक्ष राज्यात लागले. वृक्ष लागवड ही एक लोकचळवळ झाली परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी राहिलेल्या त्रूटींमुळे 99 टक्के चांगल्या कामांवर पाणी पडते. असे होऊ नये म्हणून लावलेला प्रत्येक वृक्ष, त्याचे स्थळ आणि प्रजाती याची माहिती कमांडरूमच्या माध्यमातून उपलब्ध करून द्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

वृक्ष लागवडीवर मिशनमोड स्वरूपात काम करतांना त्यांनी विविध यंत्रणांकडून होणाऱ्या 13 कोटी वृक्ष लागवडीचा आढावा घेतला. यामध्ये वन विभाग ७.५ कोटी वृक्ष लावणार आहे. तर २.५० कोटी वृक्ष इतर शासकीय विभाग, ३ कोटी वृक्ष ग्रामपंचायतींमार्फत लावले जाणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी राज्यातील सार्वजनिक जागांची माहिती एक‍त्रित केली जावी, राज्यात वृक्ष लागवडीसाठी एकूण किती जागा उपलब्ध आहे याची “लॅण्ड बँक” तयार केली जावी अशा सूचनाही वनमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

मागील दोन वर्षाच्या प्रयत्नातून राज्य वनक्षेत्रातील चार बाबींमध्ये देशात अग्रस्थानी आल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन 256 चौ.कि.मी ने वाढले असून वनेत्तर क्षेत्रातील वृक्ष लागवडीत, कांदळवन आणि बांबू लागवड क्षेत्रात महाराष्ट्राने भरीव कामगिरी केल्याचे सांगितले. भारतीय वन सर्वेक्षण अहवालात सन २०१५ च्या तुलनेमध्ये २०१७ साली महाराष्ट्र राज्यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त घनतेची जंगले यामध्ये ५१ चौ.कि.मी ची वाढ दर्शविली आहे. २०१५ मध्ये घनदाट जंगलाचे क्षेत्र ८६८५ चौ.कि.मी होते ते २०१७ मध्ये ८७३६ चौ.कि.मी इतके झाले आहे. ही वाढ शासनाने हाती घेतलेल्या ५० कोटी वृक्ष वृक्ष लागवड या कार्यक्रमाचे फलित असल्याचे ते म्हणाले. याच काळात कांदळवन क्षेत्र 82 चौ.कि.मी ने वाढले असून ते 222 चौकिमी वरून 304 चौ.कि.मी झाल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात 2015 साली एकूण जलव्याप्त क्षेत्र १११६ चौ कि.मी होते ते २०१७ मध्ये वाढून १५४८ चौ.कि.मी इतके झाले आहे. जल व्याप्त क्षेत्रातील ही वाढ ४३२ चौ कि.मी इतकी आहे.

२०१५ मध्ये बांबू प्रवण क्षेत्र ११४६५ चौ.कि.मी होते. ते २०१७ मध्ये १५९२७ चौ.कि.मी इतके झाले म्हणजे २०१५ च्या तुलनेत राज्यातील बांबू क्षेत्रात ४४६२ चौ.कि.मी म्हणजे ४ लाख ४६ हजार २०० हेक्टरने वाढ झाली आहे अशी माहिती ही त्यांनी यावेळी दिली. वनक्षेत्रातील हे यश हे वन विभागाने लोकसहभागातून केलेल्या प्रयत्नांचे यश आहे. त्यामुळे अधिकाधिक वृक्ष प्रेमींना यात सहभागी करून घ्यावे असेही ते म्हणाले. वनमंत्र्यांनी यावेळी कमांड रूमच्या कामाचा ही आढावा घेतला.

Facebook Comments