फोगाट बहिणी आशियाई स्पर्धेतून बाहेर !

नवी दिल्ली : ‘धाकड’ गर्ल्स फोगाट बहिणींचे आशियाई स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न अपुरे राहणार आहे. भारतीय कुस्ती महासंघाने फोगाट बहिणींच्या बेशिस्तीपणामुळे आशियाई स्पर्धेसाठी होणाऱ्या राष्ट्रीय कॅम्पमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. आपल्यावर आधारीत सिनेमा आल्यावर फोगट बहिणींना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर राहत नसल्याचे बऱ्याच जणांनी म्हटले. कुस्ती प्रशासनाला काही वेळा या बहिणींनी व्यवस्थित उत्तरे सुद्धा दिली नव्हती. त्यामुळे बेशिस्त फोगट बहिणींना राष्ट्रीय शिबीरामध्ये सामील न करण्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे.

राष्ट्रीय शिबीरामधून भारताचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीचे संघ निवडले जातात. यावेळी गीता, बबिता, ऋतु आणि संगिता या चौघींही कॅम्पला उपस्थित नसल्याने त्यांची नावे कॅम्पच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे काही महिन्यानंतर होणाऱ्या आशियाई ट्रायलमध्ये त्यांना सहभागी होता येणार नाही. याचाच अर्थ त्यांना आशियाई स्पर्धेत देखील सहभागी होता येणार नाही. करण जे कुस्तीपटू कॅम्पमध्ये सहभागी होतात त्यांनाच ट्रायलमध्ये संधी दिली जाते.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी सांगितले की, ” जेव्हा एखाद्या खेळाडूची शिबीरासाठी निवड केली जाते तेव्हा त्यांना आपली उपस्थिती कळवायची असते. यासाठी खेळाडूंना तीन दिवसांचा अवधी दिला जातो. या तीन दिवसांमध्ये फोगट भगिनींनी महासंघाला आपल्या अनुपस्थितीबाबत काहीही कळवले नाही. त्यांनी आपल्या प्रशिक्षकांनाही याबाबत काही सांगितले नाही. त्यामुळे त्यांची शिबीरासाठी निवड केली गेली नाही. “