डॉ.आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीवर लोकांची गर्दी

नागपूर : १४ एप्रिल आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त संत्रा नगरीतील दीक्षाभूमी येथे अति उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता दीक्षाभूमिवर येत आहे. आजच्या दिवसाच्या उत्साहाची सुरुवात झाली असून, कालपासूनच दीक्षाभूमी निळ्या रंगाच्या विद्युत रोषणाईने उजळून निघाली होती. आजच्या दिनानिमित्त दीक्षाभूमिवर विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी दीक्षाभूमिवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळेच आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त बौद्ध धर्माचे अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आपली उपस्थिती लावत आहे. देशभर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला जात आहे. देशभरातील बौद्ध बांधवांच्या प्रेरणेचे ठिकाण असलेल्या नागपुरातील दीक्षाभूमीवरंही जयंतीचा मोठा उत्सव पहायला मिळाला.

यावेळी दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनेक नागरिकांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, अनेक लोकांना दीक्षाभूमिवर प्रेरणा मिळते, त्यामुळे आजच्या दिवशी आम्ही इथे येतो आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो . याचबरोबर, ‘अनेक काळापासून ज्या समाजाबाबत लोकांना माहिती नव्ह्ती, त्या समाजाला बाबासाहेबांनी शिक्षण देऊन पुढे आणले, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा, बाबासाहेबांनी हा अनमोल ठेवा दिला म्हणून आम्ही दीक्षाभूमिवर त्यांना अभिवादन करण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया दीक्षाभूमिवर आलेल्या नागरिकांनी यावेळी दिली आहे.

 

Facebook Comments