लोकांनी दिवाळी साजरी तर केली, पण कुटंबासोबत नव्हे मोबाईलवर !

फोन आणि आयुष्य यांचा योग्य ताळमेळ साधने जरुरी

नवी मुंबई : काय मग, कशी गेली तुमची दिवाळी ? घरच्यांना, मित्रांना वेळ दिलात ना ?, की फक्त मोबाईलवरच दिवाळी साजरी केलीत ? या प्रश्नांची कटू पण खरी उत्तरे देणारा एक व्हिडिओ अग्रगण्य मोबाईल कंपनी मोटोरोलाने नुकताच जारी केला आहे.

तुम्ही तुमच्या फोनचा वापर करता की, फोन तुमचा वापर करतो ? या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओत आहे. सदर व्हिडिओमधे आपल्याला दिसते की, अनेक जण विशेषतः तरुण पिढी ऐन दिवाळीत आपल्या कुटुंबियांसोबत सण साजरा करण्याऐवजी मोबाईलवरच गुंतलेली (कनेक्टेड) आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने लोक स्वकीयांपासून तुटत चालले आहेत, नात्यांमधे संभाषणाचा अभाव दिसतोय.

यावरून स्पष्ट आहे की, या मोबाईल फोनने आपल्या आयुष्यावर अतिक्रमण केले आहे. या व्हिडिओच्या शेवटी संदेश देताना म्हंटले आहे की, आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याकरिता तुम्ही फोन आणि आयुष्य यांचा उत्तम ताळमेळ साधला पाहिजे.