३०१३ चे तिकीट देऊन प्रवाशाला छळणाऱ्या रेल्वेला दंड

शाहरनपूर : तिकीटावर १००० वर्ष पुढची तारीख असल्याने ७३ वर्षीय प्रवाशाला प्रवासात गाडीतून जबरदस्ती उतरवल्याप्रकरणी ग्राहक न्यायालयाने रेल्वेला दंड ठोठावला आहे.

निवृत्त शिक्षक विष्णुकांत शुक्ला १९ नोव्हेंबर २०१३ रोजी हिमगिरी एक्स्प्रेसने शहारनपूर येथून जौनपूरला जात होते. प्रवासात टीसीने त्यांचे तिकीट तपासले आणि तिकीटावरील तारीख २०१३ ऐवजी ३०१३ असल्याने त्यांना मुरादाबाद येथे जबरदस्तीने उतरायला लावले.

या प्रकरणी विष्णुकांत शुक्ला यांनी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. त्यांनी म्हटले की

‘मी जे व्ही जैन डिग्री कॉलेजमध्ये हिंदी विभागाचा प्रमुख होतो. मला इतकंच सांगायचं आहे की मी विनातिकीट प्रवास करणाऱ्यांपैकी नाही. पण तरीही टीसीने सर्वांसमोर मला तुच्छ वागणूक देत माझा अपमान केला. माझ्याकडे ८०० रुपये दंड भरण्याची मागणी केली. इतकंच नाही तर मला गाडीतून उतरवून दिल. माझ्या मित्राच्या पत्नीचं निधन झालं होते. उत्तरक्रियेसाठी मला वेळेत पोहोचणं आवश्यक होतं’, अशी माहिती विष्णूकांत शुक्ला यांनी दिली.

जवळपास पाच वर्ष हा खटला चालला. १२ जूनला न्यायालयाने विष्णूकांत शुक्ला यांच्या बाजूने निकाल देत रेल्वेला मानसिक त्रास दिल्याबद्दल १० हजारांचा तसंच अतिरिक्त तीन हजारांचा दंड ठोठावला.

न्यायालयाने निकाल देताना म्हटले की, ‘मध्यमवयीन व्यक्तीला प्रवासात मधेच उतरवून देणे हा शारिरीक आणि मानसिक छळ आहे. रेल्वेने दिलेल्या सेवेत काही त्रुटी असल्याचं स्पष्ट आहे’.