सर्वशिक्षाच्या योजनेतील बदलांमुळे पालक नाराज

नाशिक : सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनुदानित शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या मोफत पाठय़पुस्तक योजनेत आता काही नवीन बदल होणार आहे. या नवीन बदलानुसार, येणाऱ्या पुढच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना थेट पाठय़पुस्तकांऐवजी त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा केले जाणार. त्यासाठी जिल्ह्यातील ५ लाख ४५ हजार ३८२ लाभार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य झाले आहे.

सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत खासगी अनुदानित, आश्रमशाळा, समाजकल्याण विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठय़पुस्तके दिली जातात. मात्र, आता त्या पुस्तकांऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार, अशा शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत.

याचबरोबर,शिक्षण विभागाने जिल्ह्यातील पात्र शाळांना सूचना देऊन विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सूचना दिली असून, विद्यार्थ्यांना त्यासाठी आई-वडील अथवा पालकांसोबत राष्ट्रीयीकृत बँक किंवा ग्रामीण बँक, पोस्ट खाते क्रमांक, शेडय़ुल्ड बँकेत खाते उघडावे लागणार आहे. तसेच, पुस्तके खरेदी केल्यांनतर त्याचे बिल मुख्याध्यापकांना सादर केल्यानंतरच विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जातील.

मात्र, या निर्णयामुळे पालक फार नाराज आहे. कारण पालकांना प्रथम पैसे खर्च करावे लागतील, त्यानंतर त्यांना पैसे मिळणार. ग्रामीण भागापर्यंत पाठय़पुस्तके पोहोचविणे, वाहनांची उपलब्धता, हिशेब करण्यापर्यंत सर्वच कामांमध्ये प्रत्येक शाळेमधील शिक्षक कर्मचाऱ्याचा मोठा वेळ खर्ची होतो. त्यामुळे ही योजना निश्चितपणे यशस्वी होईल, असा विश्वास शिक्षण विभागाला वाटत आहे. मात्र, पुस्तकांचे पैसे वेळीच विद्यार्थ्यांच्या खात्यात जाणे व ते पैसे पुस्तकांसाठीच खर्च होतात की नाही, हे तपासण्याचे आव्हान शिक्षण विभागापुढे निर्माण झाले आहे.