पालघर पोटनिवडणुकीत भाजपातर्फे राणेंची तोफ धडाडणार ?

मुंबई : अखेर पालघर लोकसभा पोट निवडणुकीसाठी कुठल्याही पक्षाने निवडणुकीतून माघार न घेण्याचा निर्णय घेतल्याने आता निवडणूक अटीतटीची होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आता भाजपाने नारायण राणे यांना प्रचारात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. नारायण राणे हे शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. एकेकाळी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये असलेले नारायण राणे यांना शिवसेनेच्या प्रत्येक कमजोरीची माहिती असल्याने शिवसेनेच्या विरोधात प्रचार करण्यासाठी भाजपाने हा डाव टाकला आहे.

पालघर पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये खरी लढत होणार आहे. भाजप खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानंतर वनगा कुटुंबीयांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेने श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेची उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून दामोदर शिंगडा यांना उमेदवारी देण्यात आल्याने राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. शिवसेनेने अंधारात ठेऊन वनगा यांना आपल्या पक्षात दाखल केल्याने भाजपाचा तिळपापड झाला आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत वनगा यांना पराभूत करण्यासाठी भाजपाने नारायणास्त्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आपण भाजपाच्या उमेदवारासाठी प्रचार करू किंवा नाही याबाबत नारायण राणेंनी अजून घोषणा केलेली नाही.