पंतप्रधान मोदी पूर्ण माहिती न घेताच टीका करतात’; पी. चिदंबरम यांचे प्रतिउत्तर

नवी दिल्ली:‘राजकोटमधील एका संवादादरम्यान मी काश्मीर प्रश्नावर भाष्य केले होते. त्यावरील मोदींची प्रतिक्रिया लक्षात घेता, त्यांनी माझे विधान पूर्ण ऐकले नाही हे लक्षात येते.पंतप्रधान नरेंद्र मोदी भूताची कल्पना करुन त्यावर हल्ले करतात, अशी टीका माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केली आहे. चिदंबरम यांच्या काश्मीरबद्दलच्या विधानावर मोदींनी टीकास्त्र सोडले होते. या टीकेला चिदंबरम यांनी प्रत्युत्तर दिले.

एनडीए सरकारच्या सर्जिकल स्ट्राईकला मिळालेले यश काँग्रेसला सहन झाले नाही, या मोदींच्या टीकेलाही चिदंबरम यांनी प्रत्युत्तर दिले. ‘काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकवर टीका केलेली नाही. अशा प्रकारच्या कारवाया याआधीही झाल्या होत्या, इतकेच आम्ही निदर्शनास आणून दिले आणि याला लष्करप्रमुखांनीही दुजोरा दिला,’ असे चिदंबरम म्हणाले. शनिवारी एका कार्यक्रमात चिदंबरम यांनी काश्मीरबद्दलची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी बोलताना, काश्मीरला अधिक स्वायत्तता देण्याचे मत त्यांनी व्यक्त केले होते.

‘काश्मीर खोऱ्यातील लोकांच्या मागणीचा आदर करायला हवा. काश्मिरी लोकांची मागणी कलम ३७० ला धरुनच आहे. काश्मिरींना अधिक स्वायत्तता हवी आहे. काश्मीरमधील लोकांशी चर्चा केल्यावर तेथील लोकांना स्वायत्तता हवी असल्याचे माझ्या लक्षात आहे.

मात्र तेथील सर्वांनाच स्वायत्तता हवी आहे, असे मी म्हणणार नाही आणि बहुतांश लोकांना स्वायत्तता हवी आहे, असेदेखील मला म्हणायचे नाही. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थितीचा गांभिर्याने अभ्यास करुन कोणकोणत्या क्षेत्रात काश्मिरी जनतेला स्वायत्तता दिली जाऊ शकते, याचा विचार करायला हवा,’ असे चिदंबरम यांनी म्हटले.

काश्मीरबद्दलच्या प्रश्नावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला मी दिलेले उत्तर वृत्तपत्रात शब्दश: प्रसिद्ध झाले आहे. त्यातील नेमका कोणता शब्द चुकीचा आहे? मी काय चुकीचे बोललो आहे? पंतप्रधान मोदी केवळ भुताची कल्पना करुन त्यावर हल्ले करतात,’ असे चिदंबरम यांनी म्हटले.