शेतकरी नेते, कार्यकर्त्यांचे फोन टॅप; राजू शेट्टींचा आरोप

नगर : सरकार शेतकरी नेते, कार्यकर्त्यांचे फोन टॅपिंग करत असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केला आहे. सध्या शेतकरी नेते कुठे जातात, काय करतात, कोणाकोणला भेटतात. याकडे सरकार लक्ष ठेवत आहे. तसेच आम्ही काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅपिंग करणे असे प्रकार सुरू आहे असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.

आमची लढाई जनतेबरोबर नाही, नागरिकांना दूध हवे असल्यास त्यांनी जवळच्या गावात जाऊन फुकट घेऊन जावे असं राजू शेट्टी यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. शेतकरी हा उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने दूध विकत असल्याने त्याचा तोटा होत आहे, त्याला लिटरमागे ५ रुपये अनुदान देण्याची आमची प्रमुख मागणी असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दीडपट हमीभावाची घोषणा करणाऱ्या मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात दूध विकण्याची वेळ आली आहे असा आरोप करत राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. १६ जुलैपासून आम्ही दुधविक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असंही ते म्हणाले आहेत.