… अन्यथा काँग्रेस पक्ष इतिहासजमा होईल : संघ

नागपूर : कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि विचारक विराग पाचपोर यांनी काँग्रेसला सल्ला दिला आहे. आता तरी देशाच्या समाजाच्या विचारसरणी प्रमाणे काँग्रेस पक्षाने स्वतः मध्ये बदल करण्यास सुरुवात करावी, अन्यथा १२५ वर्षे जुन्या काँग्रेस पक्षाची वाताहात होईल आणि काँग्रेस पक्ष इतिहासजमा होईल, असे वक्तव्य पाचपोर यांनी केले आहे.

कर्नाटकात भाजपने तब्ब्ल ११४ जागा आपल्या नाव केल्या आहेत. यामुळे देश काँग्रेसमुक्त होत आहे, असे म्हणण्यापेक्षा देश काँग्रेसच्या तत्त्वज्ञानापासून मुक्त होत आहे, असेही यावेळी विराग पाचपोर म्हणाले. कर्नाटक येथील भाजपच्या यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही मोठा वाटा आहे. गेल्या काही वर्षांत कर्नाटकमध्ये संघाने आपल्या कामाचा मोठा विस्तार केला. स्वयंसेवकांच्या मदतीने संघ कर्नाटकच्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचला आहे. शाखांमध्येही मोठी वाढ झाली आहे.

‘संघाचे स्वयंसेवक देशाचे मतदार आहेत आणि त्यांनी भाजपला मतदान करुन ते एक जबाबदार नागरिक आहे, असे सिद्ध केले आहे’ अशी प्रतिक्रिया यावेळी संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक विराग पाचपोर यांनी दिली. शिवाय कर्नाटकच्या विजयाने संघ परिवारात समाधानाचे वातावरण आहे, या निकालामुळे आगामी काळातील निवडणुकांवर सकारात्मक परिणाम होईल, अशी आशाही संघाच्या नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.