मी नंबर दोनचा मंत्री व पक्षाचा बलाढ्य नेता, विरोधकांनी लक्षात ठेवावे’- चंद्रकांतदाद पाटील

कोल्हापूर: गेल्या वीस वर्षांत ज्यांनी शासकीय जमिनीवर आरक्षणे हटवून आपली हॉटेल्स, शिक्षण संस्था आणि मंगलकार्यालये उभी केली आहे. त्या सर्वांची मी यादी मागवली असून या सर्व प्रकरणांच्या मूळापर्यंत जाऊन चौकशी करून कारवाई करणार आहे. मी राज्याचा नंबर दोनचा मंत्री आणि पक्षाचा बलाढ्य नेता आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिला.

राज्याच्या नगरविकास खात्याच्या आदेशानुसार तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई रोकण्याचा निर्णय व अतिक्रमणे नियमित करण्याच्या कायद्यात बसवण्यासाठी मुंबईतील बैठकीत झालेला निर्णय आहे. त्याता माझा वैयक्तिक काही हस्तक्षेप नाही. तरी देखील विरोधक माझ्यावर बेताल आरोप करीत आहेत, त्यामुळे आता माझी सटकली आहे, असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना केले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तावडे हॉटेल परिसरातील अडीचशे एकरवर असलेले अनाधिकृत बांधकाम मनपाच्या वतीने हटवण्याच्या प्रक्रियेला मुंबईतील बैठकीत स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्तक्षेपामुळेच देण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केला आहे. यामुळे संतप्त झालेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामधाम येथे पत्रकार परिषद घेवून थेट काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांना लक्ष्य केले. यावेळी ते म्हणाले की, चिल्ल्या-पिल्ल्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःला नेते म्हणवणाऱ्यांनी समोर येवून बोलावे. यावेळी आमदार अमल महाडिक उपस्थित होते.

 

Facebook Comments