केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी सरकारची नुसती उठाठेव : अजित पवार

बारामती: सध्या लोकशाही न मानणाऱ्या लोकांच्या हातात देशाची सूत्रे असल्याने प्रसारमाध्यमांचा आवाज दाबण्यासही मागे-पुढे न पाहणारे सरकार केवळ स्वत:ची प्रतिमा जपण्यासाठी नुसती उठाठेव करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बारामतीत केला.

भाजपाला देशातील जनतेन संसदेत निर्विवाद सत्ता बहाल केली असताना लोकांच्या हितासाठी चांगले निर्णय सरकारकडून घेणे अपेक्षित असताना, विरोधकांकडून संसदेचे कामकाज चालू दिले जात नाही, अशी आवई उठवून उपोषण करणे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रडीचा डाव असल्याचे पवार म्हणाले, पुण्यातील भाजपाच्या काही आमदारांनी भरपेट नाश्ता करून उपोषणाची चेष्टा केली. लोकसभेत विरोधकांनी मांडलेल्या अविश्वासाच्या ठरावावर चर्चा होऊ द्यायची नाही. हा उपोषणामागील खरा हेतू होता तशी मोदी सरकारने आखणीही केली असल्याचे पवार म्हणाले.

ते राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राज्यस्तरीय जनजागृती अभियानाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. पवार म्हणाले, केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावावर चर्चा झाल्यास सरकारचे वाभाडे निघतील या भीतोपोटी उपोषणाची कास भाजपने धरली. मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांवर एकूण ९० हजार कोटी रुपयांचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.