शेतीच्या वादातून तहसील परिसरात एकाची हत्या

हिंगोली : जिल्ह्यातील तहसील परिसरात एका शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सीताराम नारायण राऊत असे मृत शेतकऱ्याचे तर रंगनाथ मोडे, असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांपासून सीताराम नारायण राऊत यांच्या शेताचा वाद सुरू आहे. तर हे प्रकरण न्यायालयातही सुरु असल्याचे मयताची पत्नी मनकर्णाबाई यांनी सांगितले. राऊत यांची नेहमीच हिंगोली येथे ये – जा सुरु होती. यापूर्वीही अनेकदा वाद व मारहाणही झाली होती. बुधवारी सकाळी हिंगोली येथे निघताना याच भीतीमुळे मनकर्णाबाई याही सीताराम यांच्यासोबत आल्या होत्या. तहसील परिसरात सीताराम आणि मनकर्णाबाई बसले असता, हातात तीक्ष्ण हत्यार घेऊन त्यांच्याकडे आरोपी रंगनाथ मोडे धावत गेला व राऊत यांच्या मानेवर जोराने वार केला. राऊत जखमी अवस्थेतच ‘कोणी तरी वाचवा’ असे म्हणत तहसील कार्यालयात धावले आणि व्हरांंड्यातील खुर्चीवर पडले. मात्र रक्तस्त्राव जास्तच झाल्याने ते खुर्चीवरुन खाली कोसळले. त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

या घटनेनंतर आरोपी रंगनाथ मोडे स्वत: हून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी पंचनामा केला. शेतीच्या वादाची आज हिंगोली तहसील कार्यालयात सुनावणी होती. त्यामुळे राऊत आणि मोडे हे हिंगोली येथे आले होते.