कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एक जण ताब्यात

पुणे : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात राहुल फटांगडेच्या हत्याप्रकरणी चतुश्रुंगी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सुरज शिंदे असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी याला सोलापूर जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून २१ वर्षीय सुरज शिंदेला ताब्यात घेतले आहे.

सूरज हा मुळचा दौंड तालुक्यातील भीमनगरचा रहिवासी आहे. यापूर्वी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांनीही राहुलची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला होता. हे तिन्ही आरोपी अहमदनगरमधील आहेत.

गुन्हे अन्वेशष विभागाने गेल्या आठवड्यात राहुल फटांगडे याला मारणाऱ्याची छायाचित्रे व व्हिडिओ जारी केले होते. तेव्हापासून संशयित आरोपी आपले घर सोडून फरार झाला होता. चतुश्रुंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, उपनिरीक्षक प्रेम वाघमारे यांना त्याची माहिती मिळाली. आरोपीला अधिक तपासासाठी सीआयडीच्या ताब्यात दिले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली. सीआयडीकडून त्याची चौकशी करण्यात येणार असून त्याचे फोटो व व्हिडिओशी पडताळणी करण्यात येत आहे.

राहुल फटांगडेच्या हत्येप्रकरणी चार आरोपींची छायाचित्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) जारी केली होती. दि. १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता सीआयडीने आणखी चार नव्या आरोपींची छायाचित्रे आणि चलचित्रे जारी केली. या आरोपींबद्दल माहिती देण्याचे आवाहन सीआयडीने केले आहे.