राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पेट्रोल ४ रुपये स्वस्त

मुंबई : सत्तेत नसूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबईकरांना एका दिवसासाठी का होईना थोडाफार दिलासा दिला आहे. आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईकरांना मनसेकडून पेट्रोल ४ रुपयांनी स्वस्त दिलं जाणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. आज राज ठाकरे वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेत.आणि हे औचित्य साधून मनसेने हा निर्णय घेतला आहे. मुंबईतल्या ३६ विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर स्वस्त पेट्रोल वितरित करण्यात येणार आहे. राज्यभरातील अनेक ठिकाणी ही विक्री होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या चढ्या दरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरेंच्या वाढदिनी स्वस्त पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी १५ दिवसांपूर्वीच ही माहिती दिली होती. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीका यावेळी मनसेकडून करण्यात आली होती.