बुलडाण्यातील सात तालुक्यात उन्हाळ्याच्या सुटीतही पोषण आहार

बुलडाणा : जिल्ह्यातील दुष्काळ लक्षात घेता सात तालुक्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शालेय पोषण आहेर पुरविण्यात येणार आहे.शालेय पोषण आहार योजनेंतर्गत दुष्काळी भागातील पहिली ते आठवीपर्यंतच्या ९७१ शाळांमध्ये उन्हाळी सुट्टीत १ लाख ४१ हजार ४११ विद्यार्थ्यांसाठी खिचडी शिवविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पर्जन्यमान कमी जास्त होऊन खरीप हंगामात शेतकºयांची उत्पादन परिस्थिती कशी राहिली यावरून, आणेवारी काढण्यात येते. ज्या तालुक्यात ५० पैशा पेक्षा कमी आणेवारी आल्यास त्या तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये घाटाखाली जळगाव जामोद, खामगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा, संग्रामपूर व शेगाव या तालुक्यांचा समावेश आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना सुटीच्या कालावधीतही शालेय पोषण आहार देण्याचे निर्देश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.

पहिली ते पाचविपर्यंत ९२२ शाळांमधील ८६ हजार ९०८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या ४७४ शाळांमधील ५४ हजार ५०३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या एकूण १ लाख ४१ हजार ४११ विद्यार्थ्यांना या पोषण आहाराचा लाभ मिळणार आहे. दुष्काळी परिस्थिती पाहता शनिवार व रविवारीही पोषण आहार वाटपासाठी सुट्टी न देताना विद्यार्थ्यांना दररोज शालेय पोषण आहार पुरविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

 

Facebook Comments