आता हॉकी खेळाडूंना दरमहा मिळणार 50 हजार रु भत्ता

मुंबई : भारतीय पुरूष हॉकी संघाच्या 18 सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता मिळणार आहे. त्यामुळे आता हॉकीला अच्छे दिन येणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय पुरूष हॉकी संघाला टार्गेट ऑलिम्पिक पोडियम ( टॉप्स ) योजनेंतर्गत मासिक भत्ता देण्याचे मान्य केले आहे. मंत्रालयाने गतवर्षी टॉप्स योजनेत मासिक भत्ता देण्यास सुरूवात केली होती, परंतु प्रथमच हॉकीपटूंना त्याचा लाभ मिळणार आहे.

मात्र या योजनेत महिला हॉकी संघाचा समावेश करण्यात आलेला नाही. आशियाई आणि विश्वचषक स्पर्धेतील महिला संघाच्या कामगिरीनंतर त्यांच्या समावेशाबद्दलचा निर्णय घेण्यात येणार आहे. नवनिर्वाचित प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले होते. याच कामगिरीमुळे त्यांचा टॉप्स योजनेत समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय दोन ऑलिम्पिक पदक नावावर असलेला कुस्तीपटू सुशील कुमारला 6.62 लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. जॉर्जिया येथे सरावासाठी सुशील कुमार जाणार आहे आणि तेथे सरावासाठी दोन साथीदार आणि फिजिओ यांची नियुक्ती करण्यासाठी त्याला हा निधी वापरता येणार आहे.