आता चंद्राबाबू नायडूही बसणार उपोषणावर

नवी दिल्ली : वेगवगळ्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपाने केलेल्या उपोषणानंतर आता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनीही एकदिवसीय उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकार आडमुठी भूमिका घेत असल्याच्या विरोधात ते २० एप्रिल रोजी एक दिवसीय उपोषणावर बसणार आहे. भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन एन. चंद्रबाबू नायडू यांना दिले होते. त्यानंतर तेलुगू देसम पार्टी एनडीएत सहभागी झाली होती.

मात्र, चार वर्षे उलटल्यांतरही आंध्रला विशेष दर्जा देण्याबाबत केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे. त्याच्या निषेधार्थ तेलुगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर पडली आहे. काँग्रेसने नुकतेच दलितांवरील अन्यायाच्या निषेधार्थ तर भाजपाने विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं कामकाज होत नसल्याच्या निषेधार्थ एक दिवसाचे उपोषण केले होते. त्या पार्श्वभूमीवर चंद्राबाबू नायडू त्यांच्या वाढदिवशी म्हणजेच २० एप्रिल रोजी उपोषणाला बसणार आहेत.