नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात : सुभाष देसाई

पुणे : नाणार रिफायनरी प्रकल्प होऊ नये यासाठी दहा ग्रामपंचायतींनी या विरोधाचा ठराव करून राज्य सरकारकडे पाठविला होता. या प्रकल्पाला नागरिकांचा प्रचंड विरोध लक्षात घेता, नाणार प्रकल्प भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी देसाई म्हणाले की, नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प होऊ नये अशी मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच, या प्रकल्पाबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगितले होते. नाणार प्रकल्पाला १४ गावांपैकी १० गावांनी विरोध केला होता. या नाणार प्रकल्पासाठीची शासकीय मोजणी देखील ग्रामस्थांनी होऊ दिली नाही. यामुळे भूसंपादनाची प्रक्रिया देखील ठप्प झाली होती. नाणार प्रकल्प भूसंपादनासाठीची अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, यापूर्वी नाणार प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेकडून आयोजित सभेत देसाई यांनी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यावेळी फडणवीस यांनी केवळ मुख्यमंत्र्यांचा अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. त्यावेळी यावरून वादही निर्माण झाला होता.