काहीही झालं तरी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही – राज ठाकरे

मुंबई : कुठलीही परिस्थितीत निर्माण झाली तरी नाणारमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही म्हणजे नाही, असं मनसेप्रमुख राज ठाकरेंनी राज्य सरकारला खडसावलं. नाणारमधील प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. ‘नाणारमधील प्रकल्पामुळे कोकणाचं मोठ्याप्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळेच स्थानिकांनी या प्रकल्पाचा विरोध करत आहे. मात्र फक्त पैशांसाठी या भागात जमिनी खरेदी करणाऱ्या लोकांना हा प्रकल्प हवा आहे. प्रकल्पासाठी जमिनी विकून पैसा कमावता यावा, यासाठी नाणारमध्ये भाजप नेत्यांच्या नातेवाईकांनी जमिनी खरेदी केल्या आहेत,’ असा थेट आरोप राज यांनी केला. ते मुंबईच्या मुलुंडमध्ये बोलत होते.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला. ‘नाणार प्रकल्पाला विरोध केल्यास हा प्रकल्प गुजरातमध्ये जाईल, अशी भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. याचा अर्थ सगळं काही वरच्या पातळीवर ठरलेलं आहे. देशात गुजरातसोडून इतर राज्यं नाहीत का?’ असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्री राज्यातील जनतेला सपशेल खोटी माहिती देतात, अशी टीकाही त्यांनी केली. ‘महाराष्ट्राच्या जमिनीचं वेगानं वाळवंट होतं आहे. मराठवाड्यात कित्येक फूट खणूनही पाणी मिळत नाही. राजस्थाननंतर सर्वात वाईट स्थिती महाराष्ट्राची आहे. राज्यातील जमिनीच्या वाळवंटीकरणाची प्रक्रिया वेगानं सुरू आहे. जमिनीत पाणीच नाही आणि मुख्यमंत्री आम्ही १ लाख विहिरी खणल्याची माहिती सांगत फिरतात,’ असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवरटीका केली.