माझा संघर्ष संपला, आता तर धनंजय मुंडेंच्या संघर्षाला सुरुवात झाली – पंकजा मुंडे

नागपूर : मोठा भाऊ असूनही धनंजय मुंडे यांच्यामुळे मला राजकीय जीवनात चांगलाच संघर्ष करावा लागला. मुंडे साहेबांचे कार्य पूर्ण करतांना या संघर्षांतून माझे नेतृत्व सिध्द करून बाहेर पडले. माझा संघर्ष आता संपला असून धनंजय मुंडे यांचा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नागपूर येथे पत्रकारांशी सुयोग निवासस्थानी चर्चा करताना आपले मत व्यक्त केले.

यावेळी मुंडे म्हणाल्या की, आपल्याला केवळ ओबीसींचे नाही तर जातीपातीच्या पुढे जाऊन राज्याचे नेतृत्व करायचे आहे. राष्ट्रवादी पक्षात गेल्यास आपल्याला मंत्रीपद मिळेल या लालसेपोटी धनंजय मुंडे यांनी पक्ष सोडला. मात्र राष्ट्रवादीने त्यांना कुठलीही किंमत दिली नाही. मात्र मी मंत्री झाल्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही मुंडे यांना आपल्यामुळेच मिळाले, असा टोला पंकजा मुंडे यांनी लागावला. ज्यावेळी वडील गोपीनाथ मुंडे गेले, त्यावेळी मोठा भाऊ म्हणून धनंजय यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला असता, कुटुंबाला आधार दिला असता तर कदाचित आजचे चित्र वेगळेच असते. पण ते माझ्या विरोधात निवडणूक लढले. त्यांनी माझ्यावर खोटे नाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

विरोधी पक्षनेतेपदाचा वापरही त्यांनी केवळ मला त्रास देण्यासाठीच केला. पण त्या आरोपातून मी बाहेर पडले. या काळात माझा पक्ष पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. आता माझा राजकीय संघर्ष संपला असून धनंजय मुंडे यांचा संघर्ष सुरू झाला असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.