पाकिस्तानातून आयात साखरेबाबत माहिती नाही – सुभाष देशमुख

सोलापूर : राज्यात साखरेचं गरजेपेक्षा जास्त प्रमाणात उत्पादन झाले असूनही एका उद्योग समूहाने पाकिस्तानी साखर आयात केल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. त्यातच आज राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्टीकरण दिल्याने हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानातून आयात केलेल्या साखरेची सरकारला कुठल्याही प्रकारची माहिती नाही. व्यापाऱ्याने बेकायदेशीरपणे ही साखर आयात केली असावी. त्या व्यापाऱ्याची माहिती घेऊन कठोर कारवाई करू असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले आहे.

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले आहे. यावेळी ते म्हणाले की, साखरेवरील आयातशुल्क वाढविल्यामुळे ती आयात करणे कोणालाच लाभदायक ठरणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे अलीकडच्या काळात देशात साखर आयात केलेली नाही. गतवर्षी साखरेचा प्रतिटन दर ३ हजार ५०० रुपये असताना उसाची एफआरपी जाहीर करण्यात आली. आज ही साखर २ हजार ५०० रुपये प्रतिटन दराने विकली जाते. त्यामुळे साखर कारखानेदेखील अडचणीत आल्याची कबुली सहकारमंत्र्यांनी दिली.

केंद्र सरकारने निर्यात साखरेवर ५५ रुपये अनुदान देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे; मात्र ही रक्कम पुरेशी नाही. साखरेच्या दरावर तोडगा काढण्यासाठी आठवडाभरात पंतप्रधानांना मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटणार आहे. आणि त्यावर निश्चित समाधानकारक तोडगा निघेल, अशी माहिती देशमुखांनी दिली.