कर्नाटकात राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा

मुंबई: पुढील महिन्यात होऊ घातलेल्या कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा देत असल्याची घोषणा केली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते डी. पी. त्रिपाठी यांनी मुंबईत याची घोषणा केली. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एकही उमेदवार उभा करणार नाही 2013 मध्ये राष्ट्रवादीने बेळगाव पट्ट्यात 6 जागा लढविल्या होत्या.

आमचा पक्ष हा नेहमी समविचारी पक्षांसोबत निवडणूक लढतो. त्यानुसार या निवडणुकीमध्ये आम्ही काँग्रेसला पाठिंबा देत आहोत. या निवडणुकीत राष्ट्रवादीसमवेत काँग्रेस पक्षाला नक्की यश मिळेल, असे त्रिपाठींनी सांगितले. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यादव एकत्र आले आहेत. ममता बॅनर्जी, नविन पटनाईक, चंद्रशेखर राव हे भाजपच्या विरोधात एकत्र येण्यासाठी चर्चा करत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आपल्या समविचारी पक्षांसोबत आघाडी करणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आघाडीचा निर्णय लवकर घ्यावा असे आवाहनही त्यांनी काँग्रेस पक्षाला केले.