पाक साखर खरेदीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे आंदोलन

जळगाव : पाकिस्तानकडून साखर खरेदी केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे गुरुवारी दुपारी १२.१५ वाजता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालसमोर आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात शहर महानगराध्यक्षा तेजस्विनी झांबरे, जिल्हा सचिव गौरव वाणी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, अक्षय वंजारी, शुभम येशी, सौरभ जाधव, भावेश पाटील, अमोल वराडे, वर्षा पाटील,दर्शना चौधरी, प्रशांत चौधरी, गणेश निंबाळकर यांनी सहभाग घेतला.

दाऊदला परत आणण्याची भाषा करणाऱ्या पंतप्रधानांनी खोटी आश्वासने जनतेला देत, पाकिस्तानातून साखर आणली. शेतकºयांकडे दुर्लक्ष करीत शासन साखर उद्योगाला अडचणीत आणत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. पाकिस्तानकडून साखर खरेदी करीत सरकारने भारतीय सैनिकांच्या व नागरिकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

आंदोलना दरम्यान शिवाजी पुतळा परिसरातून आमदार सुरेश भोळे हे आपल्या वाहनाने जात होते. आंदोलकांनी त्यांचे वाहन थांबवून त्यांना स्वदेशी साखर भेट दिली.