राष्ट्रवादीचे आम. अरुण जगताप यांना अटक व जामीन

औरंगाबाद : केडगाव येथे घडलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्येच्या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणातील आरोपी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप अखेर तीन महिन्यानंतर पोलिसांना शरण आले. त्यांच्यासमवेत आणखी एक आरोपी ओंकार कैलास गिरवले हाही शरण आला. विशेष तपास पथकाचे (एसआयटी) सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दोघांना अटक करुन न्यायालयापुढे हजर केले असता, दोघांचीही न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात सुमारे २५० ते ३०० आरोपी आहेत. ते सर्व आ. जगताप यांचे समर्थक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर जगताप यांचे व्याही व भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हेही आरोपी आहेत. आ. कर्डिले यांना गुन्ह्य़ाच्या दुसऱ्याच दिवशी अटक करण्यात आली होती. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. या गुन्ह्य़ात आतापर्यंत १२५ आरोपी पोलिसांनी निष्पन्न केले, त्यातील १०५ जणांना अटक करण्यात आली. एक आरोपी नगरसेवक कैलास गिरवले यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. पक्षाच्या महिला पदाधिकारी असलेल्या रेश्मा आठरे, नगरसेविका शीतल संग्राम जगताप, वैशाली ससे, रेखा जरे व सारिका नीलेश खताडे यांना अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर केला आहे. केडगावमध्ये ७ एप्रिलच्या सायंकाळी दुहेरी हत्या झाल्यानंतर पोलिसांनी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात नेले. त्यांना तेथून सोडवण्यासाठी मध्यरात्री जगताप समर्थक व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयावर हल्ला चढवत, तोडफोड करत त्यांना तेथून नेले होते. यासंदर्भात भिंगारच्या कँप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्य़ात आ. अरुण जगताप अद्यापपर्यंत फरार होते. ते आज सकाळी, तीन महिन्यांनी पोलिसांपुढे हजार झाले. तपासी अधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीचा अहवाल न्यायालयाला सादर केला होता. आ. जगताप यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचे दोषारोप पत्रपत्र सीआयडीने न्यायालयात दाखल केले आहे. या प्रकरणातील आठ आरोपींना सुनावणीसाठी नगरच्या न्यायालयात शुक्रवारी हजर करण्यात आले होते. आरोपींना दोषारोपत्र देण्यात आले. आरोपींच्या वकीलांनी न्यायलायामध्ये दोषारोप पत्रातील अन्य कागदपत्र मिळवीत, अशी मागणी केली. याप्रकरणी न्यायालयाने तपासी अधिकार्‍यांना म्हणणे मांडण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस.पाटील यांनी दिले असून या प्रकणाची पुढील सुनावणी दि. २० जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.