आमिर खानच्या कामाचे शरदपवारांकडून कौतुक

पुणे : पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून अभिनेता आमिर खान याने सुरु केलेल्या कामाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कौतुक केले असून स्वतःहून त्याला मदत करण्याची तयारीही दाखवली आहे. इतकेच नव्हे तर पवार यांनी त्याला काम वाढवण्याच्या दृष्टीने मदत करण्यासाठी काही पर्यायही सुचवले आहेत.

चळवळीला व्यापक स्वरूप येत आहे. केवळ सेलिब्रिटीच नाही तर सर्वसामान्य व्यक्तीही या कामात सहभागी होत आहेत. याच निमित्ताने आमीरने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ उपस्थित होते. पवार यांनी स्वतः या भेटीची माहिती फेसबुकच्या माध्यमातून दिली आहे.

या संदर्भात फेसबुकवर टाकलेल्या पोस्टमध्ये पवार म्हणाले की आमीर खान यांनी राज्यात सुरू केलेले पाणलोटाचे कार्य आज एक सर्वसामान्यांची चळवळ बनली आहे. त्यांच्या या कामाविषयी माहिती देण्यासाठी त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज भेट दिली. आपल्या देशात ऋतूमान अनियमित असल्याने पाणी साठवण्याची योजना राबवणे अत्यावश्यक आहे. सर्वसामान्यांचा सहभाग घेऊन त्यांना पाणीसंवर्धनाच्या कामासाठी उद्युक्त करण्याचे कौतुकास्पद काम आमिर खान यांची टीम करत असल्याचे पवारांनी म्हटले आहे.

केवळ पिण्यासाठी पाणीसंवर्धन नाही तर ६० टक्के शेतीवर अवंलबून असलेल्या देशात शेतीसाठी पाण्याचा योग्यप्रकारे वापर करण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. याबाबत इस्त्राईलचे उदाहरण समोर ठेवायला हवे. पाण्याच्या अत्यल्प उपलब्धतेतही त्यांनी थेंब थेंब वाचवून शेतीचे नंदनवन फुलवले आहे. आपल्या अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमध्ये कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त पीक कसे घेता येईल यासाठी अनेक प्रयोग केले जातात. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्येही भरपूर पाणी लागणाऱ्या ऊसाबाबत प्रयोग केले आहेत.