नवाज शरिफ यांचे नातवंड लंडन पोलिसांच्या ताब्यात

- निदर्शकाला मारहाण

लंडन : लंडन पोलिसांनी त्यांच्या नातवंडांना एकाला मारहाण करण्याच्या आरोपात ताब्यात घेतलं आहे.

याबाबतची हकीगत अशी की नवाज शरिफ यांच्या मुलाचा लंडनमधील पार्क लेन येथील अॅव्हनफिल्ड येथे फ्लॅट आहे. नवाज शरिफ यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यापासून तिथे नवाज समर्थक व निषेध करणाऱ्यांची गर्दी होते आहे.

गुरुवारी नवाज शरिफ यांच्या मुलाच्या फ्लॅट समोर जमून नवाज शरिफ यांचा निषेध करणाऱ्यांपैकी एका व्यक्तीने आक्षेपार्ह शब्द वापरल्याने शरीफ यांचे नातू जुनैद आणि झाकरिया यांनी त्याला मारहाण केली. दोघांनीही त्यांची कॉलर पकडून त्याला मारले.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन जुनैद आणि झाकरिया यांना ताब्यात घेतलं. जमावाने माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार जुनैद याने केली आहे.

अॅव्हनफिल्ड भ्रष्टाचार प्रकरणी नवाज शरिफ यांना १० वर्षे तर त्यांची कन्या मरियम यांना ७ आणि जावई कॅप्टन (निवृत्त) सफदर यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आज संध्याकाळी नवाज शरिफ आणि मरियम यांना अबु धाबी विमानतळावर अटक होणार आहे. तेथून त्यांना लाहोरला नेण्यात येईल. नवाज यांना सुमारे ७३ कोटी रुपये आणि मरियम यांना सुमारे १८.२ कोटी रुपये इतका दंडही ठोठावण्यात आला आहे.