उन्नाव, कठुआ घटनेच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिलांचा ‘कँडल मार्च’

नाशिक : उन्नाव आणि कठुआ येथील घटनेच्या निषेधार्थ रविवारी रात्री शहरात राष्ट्रवादीच्या महिलांनी कँडल मार्च काढला. कठुआ आणि उन्नाव घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत, अशी मागणी करीत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली सिडको, राणा प्रताप चौक येथे महिलांच्या वतीने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले.

जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये एका ८ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. तसेच, उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सोळा वर्षीय मुलीवरील बलात्कार झाला. या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ शहरात वेगवेगळ्या भागात कँडल मार्च काढण्यात आले. या अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींना फाशी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शनेदेखील करण्यात आली.