नारायण राणेंचा ११ डिसेंबरपूर्वी मंत्रिमंडळात; मात्र खडसेंबाबत निर्णय नाही – चंद्रकांत पाटील

पंढरपूर : काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत स्वतःचा स्वाभिमान पक्ष स्थापन करून रालोआत सहभागी झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश होणार हे निश्चित झाले आहे. नारायण राणे यांचा ११ डिसेंबरपूर्वी राज्य मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली आहे. पंढरपुरात कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना हि माहिती दिली.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यातील बैठकीत लवकरच निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री खडसेंना मंत्रिमंडळात घेण्याबाबत सकारात्मक विचार करत असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितलं.

तर दुसरीकडे पक्षाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे चांगलेच नाराज झालेले आहे. आणीबाणीच्या काळात पक्षातील अनेकांनी संघर्ष केला. त्याचे फळ म्हणून आज केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. मात्र पक्षवाढीसाठी, सत्ता मिळविण्यासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले, ते आज सत्तेतून बेदखल आहेत आणि नुकताच पक्ष स्थापन केलेले नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश व्हावा यासाठी सर्वच स्तरावरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत, अशी खंत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी येथे व्यक्त केली.

खडसे म्हणाले, आणीबाणीत नागरिकांचे मूलभूत अधिकार हिरावले गेले. देशात पुन्हा लोकशाही रूजावी, नागरिकांना त्यांचे हक्क पुन्हा मिळावेत म्हणून अनेकांनी त्या काळी संघर्ष केला. त्यांनी संघर्ष केला नसता तर आज देशात भाजपाचे १८ मुख्यमंत्री मिळाले नसते. आणीबाणी हा स्वातंत्र्यांचा दुसरा लढाच होता. असेही ते म्हणाले.