विरोध कायम असल्यासं नाणार प्रकल्प गुजरातला जाईल – मुख्यमंत्री

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाणार प्रकल्पाला जर अश्याच प्रकारचा विरोध होत राहिला तर नाईलाजाने नाणारचा प्रकल्प अखेर गुजरातकडे वळविला जाईल असा सुचक इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. सध्या या प्रकल्पावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. स्थानिकांचा आणि शिवसेनेचा तीव्र विरोध असतानाही, कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पासाठी परदेशी कंपन्यांसोबत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. सौदी अरेबियाची अरामको ही बडी कंपनी नाणार रिफायनरी प्रकल्पात ५० टक्के गुंतवणूक करणार आहे.

मात्र कोकणातील राजकीय नेते नाणारच्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. सरकारमधीलच शिवसेना आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि खासदार नारायण राणे यांनीही नाणार प्रकल्पाला विरोध केला आहे. या प्रकल्पामुळे १ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे. पण त्यामुळेच कोकणाच्या निसर्गाचं, मासेमारीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होईल असा विरोधकांचा आक्षेप आहे. हा प्रकल्प होऊ नये यासाठी कालच प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांनी शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती.या प्रकल्पामुळे कोकणातील नैसर्गिकता, शेती, काजू, आंबा बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होणार असल्याची माहिती त्यांनी पवारांना दिली होती. त्यानंतर ग्रामस्थांना आपण १० मे रोजी नाणारला भेट देणार असून त्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू असेही आश्वासन दिले होते.

मात्र त्यानंतर पत्रकारांनी याबाबत पवार विचारणा केली असता ते म्हणाले की, महाराष्ट्राबाहेर प्रकल्प जाऊ नये, म्हणून सरकारने पर्यायी जागेचा विचार होऊ शकतो का, हे पाहणे गरजेचे आहे. स्थानिकांचा विरोध पाहता प्रकल्पाची जागा बदलता येते का? याचा विचार करायला हवा. प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतरच मत व्यक्त करेन, असे म्हणत पवार यांनी त्यांची भूमिका राखून ठेवली आहे

या विरोधाच्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी हा सूचक इशारा दिला आहे. अराम्को कंपनी भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर महाराष्ट्राच्या हद्दीतच ऑईल रिफायनरीचा प्रकल्प टाकू इच्छिते. म्हणूनच राज्य सरकारने त्यांना नाणारचा प्रस्तावही दिला आहे. या प्रकल्पाला केंद्र सरकारने दुजोरा दिला आहे. पण या प्रकल्पाला असाच विरोध वाढत कायम राहिला तर हा 3 लाख कोटींचा प्रकल्प कदाचित गुजरातलाही जाऊ शकतो, तसंही गुजरात सरकारने यापूर्वीच संबंधीत कंपनीला आमंत्रित केलं आहे. असा थेट संदेशच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.