सरकारच्या निर्णयाला विरोध केला म्हणून माझी बदनामी : धनंजय मुंडे

बीड: महामार्ग आणि शासनाच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून सक्तीने जमिनी घेणाऱ्या सरकारच्या निर्णयाला विरोध केला म्हणून माझ्या बदनामीचा कट रचण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंजा गित्तेप्रकारांवरून माझी बदनामी करण्यात येत आहे, असा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र शासनाने जमीन अधिग्रहणासंबंधी नुकतेच प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकाला जाहीर आव्हान दिले होते. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारपासून वाचवण्यासाठी लढताना प्राण पणाला लावण्याची घोषणा केली होती. त्यांनतर,परळी तालुक्यातील पूस येथील जगमित्र साखर कारखान्यासाठी घेतलेल्या जमिनी परत द्याव्यात, जीव देण्याची गरज नाही, असं जाहीर पत्र तळणी येथील शेतकरी मुंजा गित्ते यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच पत्राच्या साहाय्याने आता बदनामी करण्यात येत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

गित्ते यांच्या पत्राला उत्तर देताना मुंडे म्हणले, “ज्या मुंजा गित्तेंची जमीन जगमित्र कारखान्यासाठी घेण्यात आली होती, त्या जमिनीचा संपूर्ण मोबदला त्यांना दिला आहे. त्याचे सर्व रेकॉर्ड कार्यालयात उपलब्ध आहे. हवे असेल तर त्यांना आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांनाही त्यांची जमीन परत देण्याची तयारी आहे.”

पुढे मुंडे म्हणाले, मी स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचे मूल्य आणि महत्व मला चांगलेच माहित आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या बांधवांची जमीन मी कदापिही घेणार नाही. गित्ते यांच्यासह या प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना मी त्यांच्या जमिनी खरेदी केलेल्या भावात किंवा आजच्या भावात परत करायला तयार आहे, कारखाना सुरु झाला नसल्यामुळे त्यांच्या मुलांना नोकरी देण्याचा प्रश्नच येत नाही. प्रकल्प सुरू झाला असता, तर त्यांना नक्कीच नोकरी दिली असती. त्यांच्याकडे तो चेक कसा गेला याबाबत न्यायालयीन कारवाई सुरू असल्याचेही ते म्हणाले.

यादरम्यान , मागील चार वर्षांपासून सातत्याने मुंजा गित्ते यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे काही नेते आपली बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. सरकारने मागील आठवड्यात घेतलेल्या एका भूसंपादना संबंधीच्या निर्णयाला मी कडाडून विरोध केल्यामुळे पुन्हा एकदा आपली बदनामी करण्यासाठी श्री मुंजा गीते यांचा वापर केला जात आहे, असं मुंडे म्हणाले.