मुनगंटीवारांनी मागितली उद्धव ठाकरेंना भेटीची वेळ

मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शिवसेनेसोबत युती करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. मात्र अद्यापपर्यंत ठाकरेंकडून भेटीची वेळ देण्यात आलेली नाही. मात्र उद्धव ठाकरेंकडून भेटीसाठी वेळ देण्यात आली तर, संध्याकाळी पाच वाजता ‘मातोश्री’वर या दोघांचीही भेटहोऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पाला होत असलेला कडवा विरोध, वर्षभरावर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेली सत्ताधाऱ्यांची कोंडी, युतीची चर्चा या पार्श्वभूमीवर ही मुनगंटीवारांनी मागितलेली वेळ अत्यंत महत्वाची मानली जाते आहे.
याआधीच शिवसेनेनं यापुढे भाजपशी कुठलीही युती करणार नाही, असं जाहीर केलं होतं. त्यामुळे आता या भेटीत नेमकी कुठल्या विषयावर चर्चा होणार याकडे दिल्लीचंही लक्ष लागलं आहे.

आगामी सर्व निवडणुका शिवेसना स्वबळावर लढणार आहे. असं उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या मेळाव्यातूनच जाहीर केले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या वक्तव्यावर ठाम राहतात की भाजप त्यांना निर्णय बदलायला भाग पाडतील, हे या भेटीनंतर स्पष्ट होणार आहे. आता सुधीर मुनगंटीवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट होते का आणि भेट झाल्यास कुठल्या विषयावर चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

 

Facebook Comments