मुकुल रोहतगी यांची लोकपाल निवड समितीमध्ये निवड

नवी दिल्ली : मागील वर्षांपासून लोकपाल निवड समितीमध्ये ख्यातनाम विधिज्ञ हे पद रिक्त होते. मात्र, आता या पदावर मुकुल रोहतगी विराजमान होणार आहे. केंद्र सरकारने आज आपण मुकुल रोहतगी यांची ख्यातनाम विधिज्ञ या लोकपाल समितीमधील पदावर नेमणूक करत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

11 मे रोजी नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये लोकपाल समितीत मुकुल रोहतगी यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपिठाला सांगितले. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी सत्तेत आल्यानंतर 2014 साली रोहतगी यांची नेमणूक महान्य़ायवादी (अॅटर्नी जनरल) पदावर करण्यात आली होती. मात्र, जून 2017मध्ये रोहतगी यांनी या पदाचा राजीनामा दिला होता.

लोकपाल निवड समितीमध्ये ख्यातनाम विधिज्ञाबरोबर, भारताचे पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेता, लोकसभेच्या सभापती अशा सदस्यांचा समावेश असतो. 11 सप्टेंबर 2017 रोजी ख्यातनाम विधिज्ञ या पदावर असणारे पी. पी. राव यांचे निधन झाल्याने ते पद रिक्त होते.