मुफ्ती यांचा दहशतवादाविषयी दृष्टीकोन सौम्य : सुब्रमण्यम स्वामी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची भाजपवरील टीका ही दहशतवादाविषयी त्यांचा दृष्टीकोन सौम्य असल्याचे दर्शवते, अशी टीका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. नुकतेच मेहबुबा मुफ्ती यांनी भाजप पीडीपीत फूट पडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. त्याला स्वामी यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे.

यावेळी स्वामी म्हणाले की, मुफ्ती यांनी त्यांच्या वक्तव्यातून दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचेच सिद्ध होत आहे. दहशतवादाविषयी त्यांचा दृष्टीकोन कायमच मवाळ आहे, त्यांचे वडीलही त्याच विचारांचे होते. मुफ्ती सत्तेत असताना गुलमर्ग, अनंतनाग आणि शंकराचार्य हिल्स या ठिकाणांची नावे बदलण्यात आली होती. याचा अर्थ त्यांना काश्मीरचे इस्लामीकरण करायचे होते. काश्मीरी पंडितांच्या हालअपेष्टा होत असताना मेहबुबा मुफ्ती आणि त्यांचे वडील काय करत होते, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

पुढे ते म्हणाले, काश्मीर खोऱ्याला अशा दांभिक लोकशाही मानणाऱ्या नेत्यांची लागण झाली आहे. मात्र, भाजपने योग्य वेळी पीडीपीचा पाठिंबा काढला, हे चांगले झाले. आता जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. तसेच, पुढील निवडणुका स्वत्रंत लढण्याचा भाजपचा मार्ग मोकळा झाला आहे.