स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे 1 मे पासून आंदोलन

पुणे: शेतक-यांनी आत्महत्येचा विचार करू नये, यासाठी येत्या १ मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ‘मी आत्महत्या करणार नाही तर मी लढणार’या अभियानाला सुरूवात करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले कर्जबाजारीपणाला कंटाळून व शेती मालाला हमीभाव मिळत नसल्याने राज्यातील शेतक-यांचे आत्महत्या करत आहेत.

नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील माजी खासदार सुबोध मोहिते यांनी स्वाभिमानी शेतकरी पक्षात प्रवेश केला असून रविकांत तुपकर यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे शेट्टी यांनी यावेळी जाहीर केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दोन दिवस देहू येथे पार पडली. या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती शेट्टी यांननी यावेळी दिली.

शेट्टी म्हणाले,मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या धुळे जिल्ह्यातील गावापासून अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. राज्यातील ११ जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार असून ९ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात या अभियामाची सांगता होईल.

खासगी सावकारासह शेतक-याचे सर्व कर्ज एक रक्कमी माफ करून शेतक-यांचा सात-बारा कोरा करावा. तसेच शेतक-याला दीडपट हमीभाव मिळावा यासाठी येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनावेळी दोन विधेयके स्वत: संसदेत सादर करणार असल्याचे ते म्हणाले. त्यास देशातील ३२ हून अधिक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. त्याचप्रमाणे येत्या १ मे रोजी होणा-या गाव सभेत या विधेयकांना पाठिंबा देण्याचे ठराव केले जाणार आहेत. हे ठराव लोकसभा व राज्यसभेच्या सभापतीना पाठविले जाणार आहेत.