यंदा 29 मे रोजी मान्सून केरळमध्ये धडकणार !

पुणे : यंदा केरळमध्ये वेळेआधीच मान्सून येणार आहे, असे भारतीय हवामान विभागाने आज जाहिर केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी 29 मे रोजी केरळमध्ये मान्सून धडकणार आहे. केरळमध्ये मान्सून आल्यानंतर चार दिवसांत राज्यात मान्सून धडकण्याची चिन्हे आहेत. 23 मे रोजी अंदमानला मान्सून दाखल होणार आहे. अंदमान ते तळ कोकण हा मान्सूनचा हा प्रवास 17 ते 21 दिवसांचा असतो. पण बरेचदा वादळी स्थीतीमुळं श्रीलंकेमध्ये अडकून राहतो.

मान्सून दरवर्षी सर्वसामान्यपणे दि. 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मात्र, यंदा तब्बल ७ दिवसांआधी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्यावर्षी केरळमध्ये वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर 30 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. केरळ किनारपट्टीजवळ दि. 25 ते 27 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज असून, त्या दरम्यान तेथे मुसळधार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे.

यंदा पाऊस सामान्य राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी)व्यक्त केली होती. यंदा पाऊसमान कमी राहण्याची शक्यता कमीच असल्याचं आयएमडीने म्हटलं आहे. पावसाचं प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता साधारणत: 42 टक्के असेल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता 12 टक्के असेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासात त्याची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, केरळचा बराच परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात 2 ते 3 जून रोजी पूर्व मोसमी पाऊस होण्याचा अंदाज गेल्यावर्षी वर्तवण्यात आला होता.