विनयभंग : तक्रार घेण्यासाठी महिलेला 18 तास ताटकळत ठेवलं!

उस्मानाबाद : कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणांमुळे सध्या सर्वत्र महिलांबाबतच्या असहिष्णुतेबाबत संताप व्यक्त होत असतांना, उस्मानाबादमध्ये विनयभंगाची तक्रार करण्यासाठी गेलेल्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये १८ तास बसवून ठेवण्यात
आल्याने चीड व्यक्त करण्यात येते आहे.

या बाबतची हकीगत अशी की एक महिला शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देण्यासाठी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनला गेली. तपास अधिकारी दिवसभरात बदलत गेले मात्र कुणीही तिची तक्रार नोंदवून घेतली नाही! कंटाळून त्या महिलेने रात्री अडीच वाजता पोलीस मदत केंद्राला फोन केला. तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. शेवटी पहाटे पाच वाजता ही महिला घरी निघून गेली. सकाळी अकरा ते दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत

पोलिसांनी या महिलेला पोलीस स्टेशनमधे नुसते ताटकळत बसवून ठेवलं! या महिलेच्या मूळ तक्रारीवर तब्बल पाच दिवसांनंतर आज पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.