खड्ड्यात बेडशीट अन् उशी टाकून मनसेचे आंदोलन

ठाणे : शहरातील रस्त्यांच्या कामावर आणि कोट्यवधींचा खर्च केला जातो. तरीही रस्त्यांतील खड्ड्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. प्रशासनाच्या याच दुर्लक्षितपणाचा निषेध नोंदविण्यासाठी ठाणे मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यात बेडशीट आणि उशी टाकून झोपून अभिनव आंदोलन केले. रस्त्यावरील खड्डे बुजवा अन्यथा अधिकाऱ्यांच्या अंगाला चिखल चोळू, अशा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी यावेळी दिला.

ठाण्याच्या केसल मील नाका परिसरातील खड्ड्यात आज दुपारी मनसे कार्यकर्ते बेडशीट आणि उशी घेऊन झोपले. आंदोलनाच्या वेळी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.

ठाण्यात रस्त्यांवर आणि उड्डाणपुलांवर खड्डे पडल्याने वाहनचालकांना सातत्याने त्रास होत आहे. तर याच खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडल्या आहेत. मात्र, या सर्व घटनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मनसे आंदोलनाचा वेगळाच मार्ग पत्करला.