मनसेला खिंडार पडण्याची शक्यता : शिशिर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांच्या तोंडावर मनसेचे ज्येष्ठ नेते शिशीर शिंदे लवकरच आपल्या स्वगृही म्हणजे शिवसेनेत परतण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे आणि शिशीर शिंदे काही दिवसांपूर्वी बीकेसी येथील एका लग्नसमारंभात यांची भेट झाली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये बराचकाळ चर्चाही झाली होती. हा सगळा घटनाक्रम पाहता शिशीर शिंदे लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता तसेच राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता शिशीर शिंदेंसारख्या जुन्या नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यास मुंबई उपनगरात मनसेला आणखी एक मोठे खिंडार पडेल.

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना विधानसभेत मारहाण करणाऱ्या मनसे नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. यामुळे ते बराच काळ चर्चेतही होते. एकूणच राज यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते म्हणून शिशीर शिंदे यांचा लौकिक होता.
राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या प्रमुख नेत्यांमध्ये शिशीर शिंदे यांचा समावेश होता. शिशीर शिंदे भांडूप (प.) विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.