भामरागड चकमकीपासून बेपत्ता 7 युवक-युवती ठार

गडचिरोली : 22 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीपासून बेपत्ता झालेले साईनाथ यांच्या गट्टेपल्ली या गावातील सात युवक-युवती पोलिस-नक्षल चकमकीतच ठार झाल्याची शक्यता समोर येत असून ते सर्वजण नक्षल चळवळीशी जुळलेले होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही चकमक भामरागड तालुक्यातील कसनसूर येथे झाली होती.

नक्षल चकमकीपासून गट्टेपल्ली येथील इरपा वृत्ते मडावी (२३), मंगेश बकलू आत्राम (२६), रासो पोचा मडावी (२२), मंगेश चुंडू मडावी (१९), अनिता पेडू गावडे (२१), नुसे पेडू मडावी (२३) हे सहा युवक व युवती बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दाखल केली आहे. याशिवाय रासो चुकू मडावी ही १५ वर्षाची अल्पवयीन मुलगीही बेपत्ता आहे. त्यामुळे तिचे अपहरण झाल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

त्या चकमकीतील एकूण ३४ जणांपैकी २० जणांची ओळख पटली नाही. विशेष म्हणजे त्यांच्यापैकीच एक असलेली बुज्जी करवे उसेंडी (१७) ही युवतीही चकमकीत ठार झाली असून तिची ओळख पटवून पालकांनी त्याच वेळी तिचा मृतदेह ताब्यात घेतला होता.

चकमकीनंतर तीन-चार दिवसपर्यंत काही नक्षल्यांचे मृतदेह जंगलात तर काहींचे इंद्रावती नदीत मिळाले होते. या चकमकीत नक्षल कमांडर साईनाथ हासुद्धा मारल्या गेला. आठपैकी एक युवती नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाली याचा अर्थ बेपत्ता असलेले बाकी सात युवक-युवतीही त्यावेळी नक्षल्यांसोबतच होते व तेसुद्धा त्याच चकमकीत मारले गेले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

पोलिसांच्या हाती लागलेल्या डायरीत आठ जणांचे नक्षली पोषाख शिवण्यासाठी माप दिल्याची नोंद आढळली आहे. वयावरून ते सर्वजण नक्षल कमांडर साईनाथच्या सहकार्याने नक्षल चळवळीत रूजू झाले असण्याची शक्यता वाढत असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.