द्वारकामाईच्या भिंतीवर उमटली साईबाबांची प्रतिमा!

- मध्यरात्रीनंतर दर्शनासाठी भक्तांची गर्दी

शिर्डी : द्वारकामाईत साईबाबा नेहमी जिथे बसायचे त्या भिंतीवर बुधवारी शेजारतीनंतर साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची वार्ता पसरताच मध्यरात्रीनंतर भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

गुरुवारी सकाळीही दर्शनासाठी नेहमीपेक्षा लांब रांगा लागल्या होत्या. साईबाबांच्या आगमनापासून निर्वाणापर्यंतचे वास्तव्य द्वारकामाई मशिदीत होते. साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची माहिती पसरताच मध्यरात्री भक्तांची गर्दी झाली; व्यवस्था सांभाळणे सुरक्षा विभागाच्या आटोक्याबाहेर गेले.

साईबाबा शिर्डीत आल्यापासून निर्वाणापर्यंतचे द्वारकामाई मशिदीत राहिले त्यामुळे भक्तांच्या दृष्टीने द्वारकामाईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजवर या मंदिरात अनेकदा चमत्कार म्हणाव्या, अशा घटना घडल्याचे सांगितले जाते. बुधवारी मध्यरात्री, गुरूवारचा शुभारंभ होताना द्वारकामाईतील कोपऱ्यात काही भाविकांना बाबांचा चेहरा दिसल्याची चर्चा सुरू झाली. या कोपऱ्यात बाबा दिवा लावत होते. आजही या कोप-याला रोज हार घालतात. नेमके याच ठिकाणी बाबांचे दर्शन झाल्याची चर्चा सुरू झाल्याने उत्सुकतेपोटी अनेकांनी याठिकाणी धाव घेतली. यापूर्वीही येथे सार्इंची प्रतिमा दिसल्याचे सांगितले जाते.

यानंतर थोड्या वेळातच द्वारकामाई परिसर भाविकांनी खचाखच भरून गेला. गर्दी नियंत्रणात आणताना सुरक्षा रक्षकांच्या नाकीनऊ आले. साईनामाने अवधी साईनगरी मध्यरात्री दुमदुमली होती. अनेकांनी या दृश्याचे चित्रीकरण केले. छायाचित्रे काढली. काही क्षणातच ही घटना सोशल मीडियातून व्हायरल झाली.