खनिज विकास निधीबाबत चौकशी करण्यात येईल – सुभाष देसाई

नागपूर : रायगड जिल्ह्यात खनिकर्म खनिज विकास निधीअंतर्गत रस्त्यांची कामे सुरु आहेत. या कामांमध्ये निधी देण्यास त्रुटी असतील तर पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना आदेश देऊन चौकशी करण्यात येईल, अशी माहिती उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.

खनिज विकास निधीबाबत सदस्य अनिकेत तटकरे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना श्री.देसाई बोलत होते. ते म्हणाले, रायगड जिल्ह्यात खनिज विकास निधीअंतर्गत 456.89 लाख अशा 12 कामांना मान्यता देण्यात आली आहे. खरवली, सुरव, मोर्बा ता.माणगांव येथील रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. मात्र ही कामे आता खनिज विकास प्रतिष्ठान यांच्याकडे वर्ग केली आहेत. 1 सप्टेंबर 2016 चा अधिनियम निरसित झाल्याने आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी खनिज विकास प्रतिष्ठान निर्माण करण्यात आले आहे. याचे अध्यक्ष पालकमंत्री तर सचिव जिल्हाधिकारी असतात. यामुळे या निधीत काही त्रुटी असतील तर चौकशी करुन निधीची पुर्तता करण्यात येईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सुनिल तटकरे यांनी सहभाग घेतला.