लातूर येथे जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के

लातूर : जिल्ह्यातील औसा तालुक्यातल्या अनेक भागात आज दुपारी १२ वाजून २३. मिनिटाला भूकंपाचे सौम्य धक्के बसले. यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लातूरच्या औसा तालुक्यातील किल्लारी, बेलकुंड, आशिव या भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सुदैवाने या धक्क्यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

अचानक भूकंप झाल्यानं गावातील सर्व लोक घराबाहेर पडले आहेत. १९९३ साली महाप्रलयकारी भुकंपानं किल्लारी सह आसपासची दहा गावं उध्द्वस्त झाली होती. यात अनेक गावे जमीनदोस्त झाली. हजारो लोक मृत्यूमुखी पडले. तर शेकडो जणांना कायमचे अपंगत्व आले होते. त्यामुळे आजही या भागात भूकंपाची भीती नागरिकांमध्ये आहे. आजचा भूकंप हा ३.० रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा असल्याची नोंद भूकंप मापन केंद्रात करण्यात आली.