स्वच्छ भारत अभियानात महत्वाची भूमिका माध्यमांची आहे : नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात “स्वच्छ भारत अभियान” सुरू केले. मात्र, या अभियानाला मदतकार म्हणून प्रसारमाध्यमांनी आपली भूमिका उत्तम रीतीने पार पडली, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भाजपच्या वतीने आज दिल्लीत ‘दीपावली मंगल मिलन’ या कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यावेळी मोदी बोलत होते.

या कार्यक्रमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, स्मृती इराणी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केले.

शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. एक काळ असा होता की, पत्रकारांना शोधावे लागत असे, आता मात्र प्रसारमाध्यमांचा विस्तार झाला आहे. त्यामुळे पत्रकार मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. लोकशाहीसाठी ही बाब निश्चितच चांगली आहे. देशात सुधारणा कशा प्रकारे व्हायला हव्यात याबाबत पत्रकार सूचना देतात, राजकारण्यांनी नेमके कोणत्या मुद्द्याकडे लक्ष द्यायला हवे हेदेखील पत्रकारांमुळे समजते असेही मोदी यांनी म्हटले.

स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले ते प्रसारमाध्यमांच्या भूमिकेमुळेच त्यांनी ज्या प्रकारे या अभियानाला प्रसिद्धी दिली, त्याचमुळे या अभियानाबद्दल घरोघरी माहिती पोहचली, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.दीपावली मिलन महोत्सवाची सांगता झाल्यावर अनेक पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती. आपल्या भाषणानंतर मोदींनी अनेक पत्रकारांची भेट घेतली आणि आनंदाने त्यांच्यासोबत सेल्फीही काढले.