बालमृत्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना कोअर कमिटीची मंत्रालयात बैठक मुख्य सचिवांनी घेतला आढावा

मुंबई : राज्यातील आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा आढावा आज मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी घेतला. मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीची बैठक झाली. यावेळी अमरावती, नाशिक, जळगाव, नांदेड, अहमदनगर, गडचिरोली, ठाणे, नांदेड येथील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत आढावा घेतला.

आरोग्य, महिला बालविकास आणि आदिवासी विकास विभागांनी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतल्यानंतर मुख्य सचिव म्हणाले, राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य सेवेसाठी स्थानिक गरजेनुसार निर्णय घेण्यात आले असून त्यानुसार नंदुरबार येथे नविन सिटी स्कॅन मशीन देण्यात येणार आहे, त्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी एक्स्प्रेस फिडर तयार करण्यात येत आहे. नंदुरबार येथील बोट ॲम्ब्युलन्ससाठी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे दोन पथक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात 1500 नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यात आले असून येत्या तीन महिन्यात तेथे बीएएमएस डॉक्टर नेमण्यात येतील. हे डॉक्टर नियुक्तीचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे कुपोषित बालकांच्या उपचारासाठी पोषण पुनर्वसन केंद्र (एनआरसी) नव्याने स्थापन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यातील चुरणी, चिखलदरा येथेही नवीन पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

मेळघाट येथे सेंट्रल किचन तातडीने सुरू करावे त्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीची मदत घ्यावी. यामाध्यमातून शाळा आणि अंगणवाडीतील मुलांना पोषक आहार देत येईल. त्यासाठी सेन्ट्रल किचन लवकरात लवकर सुरू करावे, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.

यावेळी आदिवासी भागात व्हीसीडीसी सुरू करण्याबाबत आढावा घेण्यात आला. मेळघाट भागात इंटरनेट कनेक्टिव्हीटीसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा झाली. तातडीने इंटरनेट सुविधा उपलब्ध झाल्यास लाभार्थ्यांना विविध योजनांचे अनुदान मिळण्यासाठी वेळ जाणार नाही.

यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. संजीवकुमार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, पालघर, नंदुरबार येथील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, समितीचे सदस्य उपस्थित होते.