काँग्रेसच्या चुकीच्या प्रचाराने घात केला : मायावती

लखनौ : कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक प्रचारात काँग्रेसच्या चुकीच्या प्रचाराने घात केला, त्याचा फटका जनता दल (सेक्यूलर) सोबत काँग्रेसलाही बसला. आता तरी जनता दल सेक्यूलरला भाजपाची ‘बी टीम’ म्हणू नका, अशी टीका बहुजन समाजवादी पार्टीच्या सर्वेसर्वा मायवती यांनी काँग्रेसवर केली आहे.

कर्नाटकमधल्या पराभवासाठी मायावती यांनी राहुल गांधी यांना कारणीभूत ठरवलं. निवडणूक प्रचाराच्यावेळी राहुल गांधी यांनी जेडीएसवरही टीका केली होती. त्यांचा हाच प्रचार भाजप आणि आरएसएससाठी फायदेशीर ठरला. काँग्रेसने जेडीएसला भाजपची ‘बी टीम’ म्हटलं होत, यामुळेच अनेक मुस्लिमबहुल भागांत काँग्रेसची मतं विभागली गेली. मुस्लिम मतं विभागली गेल्याचा फटका काँग्रेससोबत जेडीएसलाही बसला, त्यामुळे दुर्दैवानं याठिकाणी भाजपाचे उमेदवार निवडून आले, असे त्या म्हणाल्या.